“हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, व ते वाया जाऊ द्यायचे नसते”
रायगड जिल्हा प्रतिनिधी:- कैलासराजे घरतखारपाडा पेण
महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी,प्रकल्पग्रस्त आणि ओबीसी समाजासाठी ज्यांनी आपलं संबंध आयुष्य खर्ची घातले त्या लोकनेते दि.बा.पाटील यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.आज २४ जून २०२५ …१२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
१९८० साली ओबीसींच्या उन्नतीसाठी मंडल आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला.परंतु केंद्र सरकारने या अहवालाकडे दुर्लक्ष करीत तो अहवाल बासनात गुंडाळून ठेवला.त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरली. या मंडल अहवालाची अंमलबजावणी केंद्र सरकारने त्वरित करावी,यासाठी देशातील ओबीसी नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले.महाराष्ट्रात ऍड.जनार्दन पाटील, गोपीनाथ मुंडे,दि.बा.पाटील, आदी नेते ओबीसी समाजासाठी सभा घेऊन मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी करीत होते.
दि.बा.पाटील यांनी ओबीसी नेत्यांसह महाराष्ट्राच्या अनेक भागात दौरे काढून तेथे सभा घेतल्या आणि या मंडल आयोगासंबंधी ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.काही काळ व्ही.पी.सिंह यांच्या बरोबरही राहून महाराष्ट्रभर यासाठी दौरा केला.
२४ डिसेंबर १९८२ रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची दुसर्यांदा निवड झाली.१९८३ मध्ये महाराष्ट्रात पुन्हा दुष्कळी परिस्थिती निर्माण झाली.ती परिस्थिती पाहण्यासाठी दि.बा.पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा केला व संबंधितांच्या बैठका घेऊन दुष्काळ निवारणाच्या कार्यास गती दिली.या त्यांच्या कामाची सत्ताधारी व विरोधी अशा अनेक आमदारांनी प्रशंसा केली.
त्याच दरम्यान म्हणजे १९८३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा न करताच राज्य सरकारचे मत मंडल आयोगाच्या विरोधात असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला.त्याविरोधात दि.बा.पाटील यांनी महाराष्ट्रातील विधानसभेत प्रश्न उपस्थित केला व सरकारला धारेवर धरले. त्याला सर्व विरोधी आमदारांनी पाठिंबा दिला.त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.विधानसभेचे कामकाज बंद पडले.त्यादिवशी सर्व वर्तमानपत्रात दि.बां.च्या नावाची हेडलाईन्स झळकली.
दि.बा.पाटील यांनी केलेल्या या कामाची दखल नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड क्लास या देशपातळीवरील संघटनेने घेऊन त्यांची कार्यकारिणीवर नियुक्ती केली.पुढे दि..बां.चं कार्य पाहून त्यांंची या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षापदी निवड केली गेली.
मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी दि.बा.पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध भागात भरपूर सभा घेतल्या.१९८३ साली याच मागणीसाठी मुंबईमध्ये नॅशनल युनियन आफ बॅकवर्ड क्लास या संघटनेच्या वतीने एक परिषद घेण्यात आली.
या परिषदेच्या अध्यक्षपदी दि.बा.पाटील होते तर उद्घाटक एस.एम.जोशी होते.त्यानंतर या परिषदेच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात ” राखीव जागा समर्थन समिती ” ची स्थापना करण्यात आली.त्याचे अध्यक्षपद दि.बा.पाटील यांना देण्यात आले.या समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक परिषदा,सभा घेण्यात आल्या.
१९८६ च्या फेब्रुवारी महिन्यात नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड क्लास या संघटनेच्या वतीने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सत्याग्रहाचा सप्ताह आयोजित केला होता.दि.बा.पाटील यांचा त्यात प्रमुख सहभाग होता.या सप्ताहाच्या निमित्ताने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सहभागी होण्यासाठी उरण, पनवेलमधील १००हून अधिक कार्यकर्ते आमदार दत्ता पाटील आणि दत्तूशेठं पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामिल झाले होते.
पुढे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीचे आंदोलन सुरूच होते.दि.बां.च्या सभांचा धडाका चालूच होता.५ सप्टेंबर १९८३ रोजी औरंगाबाद येथे मंडल आयोगाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात भाषण करताना दि.बा.पाटील यांना हृदय विकारांचा सौम्य झटका आला.त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते.तेथे डॉ.झालटे त्यांच्यावर उपचार करीत होते.
या आजाराचे वृत्त पनवेलला घरी न कळविण्याची सूचना त्यांनी आपले स्वीय सचिवास दिली होती.पण हे आजाराचे वृत्त सकाळी रेडिओ वरील बातमीतून सर्वत्र पसरले.दि.बां.च्या घरीही ही बातमी समजल्यावर घरचे लोक चिंताग्रस्त झाले.त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी,मुलगी आणि पुतण्या औरंगाबादला गेले आणि त्यांनी हाॅस्पिटलमध्ये दि.बां.ची भेट घेतली.त्यांची आस्थेने विचारपूस केली. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती ठिक होती त्यामुळे ते सर्वजण दि.बां.ना घेऊन पनवेलमध्ये येणार होते.परंतु सकाळी त्यांचा रक्तदाब वाढला.त्याचे कारण हाॅस्पिटलमधील एक पेशंट फार तळमळत होता त्यांच्याकडे नर्सेस दुर्लक्ष करतात म्हणून दि.बा.स्वत: उठून जात होते त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला.
त्यानंतर दि.बां.नी आपल्या पत्नीला,मुलीला आणि पुतण्याला घरी जाण्यास सांगितले.
पुढे एका नर्सच्या सोबतीने त्यांना विमानाने मुंबईला आणण्यात आले.मुंबईत सेंट जॉर्ज हाॅस्पिटलमधे ते १५ दिवस उपचार घेत होते.त्यांच्यावर डॉ.फाळके तेथे देखरेख करीत होते.त्यानंतर ते पन्हाळगडावर विश्रांतीसाठी १५ दिवस राहीले.
१९९० साली पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी समाजासाठी शिक्षण व नोकर्यांमध्ये आरक्षण जाहीर केले त्यानंतर मंडल आयोगाच्या विरोधात प्रतिगामी शक्तीनी गुजरात राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू केले.त्यावेळी व्ही.पी.सिंग सरकारने जाहीर केलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशींना पाठिंबा देण्यासाठी व गुजरातचे लोण महाराष्ट्रात येऊ नये,आलेच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी दि.बा.पाटील यांनी राखीव जागा समर्थन समितीतर्फे मुंबईत एक परिषद घेऊन ओबीसी समाजाला सतर्क केले.या परिषदेला ओबीसी समाजासाठी काम करणारे अनेक नेते उपस्थित होते.त्यांनी दि.बां.च्या प्रयत्नांना उत्स्फूर्त साद दिली.
दि.बा.पाटील यांचे ओबीसी समाजासाठीचे काम अशाप्रकारे अखंडपणे सुरू होते.महाराष्ट्र ओबीसी फेडरेशनचे ते अध्यक्ष होते.देशात ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे,या मागणीसाठी दि.बा.पाटील यांनी जानेवारी २००१ साली दिल्लीत ५० जणांचे एक शिष्टमंडळ नेले होते.या शिष्टमंडळाने उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर ही मागणी मांडली.त्यांनी दि.बां.ची ही मागणी अमान्य केली.तेव्हा या शिष्टमंडळाने देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांना ओबीसी समाजाची जनगणना कसी आवश्यक आहे,हे दि.बां.नी पटवून दिले.त्यामुळे सर्व पक्षीय मागास खासदारांनी या प्रश्नावर लोकसभेचे कामकाज रोखून धरले.मग सरकारनेही ओबीसी समाजाला आश्वासन देत वेळ मारून नेली.एव्हढे वजन दिल्लीत दि.बां.चे होते.
महाराष्ट्र विधिमंडळातले दि.बा.पाटील यांचे कामही अतुलनीय असेच होते.त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न विधानसभेत पोटतिडकीने मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
१ एप्रिल १९५७ रोजी विधानसभेत कूळ कायदा मंजूर करण्यात आला.तेव्हा या कूळ कायद्यातील पळवाटांवर दि.बां.नी विधानसभेत सतत साडेचार तास अभ्यासपूर्ण भाषण करून सरकारला त्या दुरुस्त्या करण्यास भाग पाडले.अशाप्रकारे त्यांनी कमाल जमीन धारणा कायदा, रोजगार हमी योजना कायदा, महाराष्ट्र महसूल कायदा,सात बाराच्या उताऱ्यात तलाठ्याचे अधिकार काढून घेण्याचा कायदा, गर्भजल परिक्षेला विरोध करण्याचा कायदा, सिडकोसाठी जमीन घेण्याचा कायदा,एम.आय.डी.सी.साठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा कायदा या सर्व वेळी दि.बां.नी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारला केलेल्या उपसूचना मान्य कराव्या लागल्या.मुंबईतील घर दुरुस्ती कायद्याला तर दि.बां.नी २०० उपसूचना मताला टाकून पहाटे पाच वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज सुरू ठेवले होते.
दि.बा.पाटील बोलायला उभे राहिले की,सारी विधानसभा त्यांंचे विचार ऐकण्यासाठी स्तब्ध व्हायची.मुख्यमंंत्रीही निमुटपणे व एकाग्रतेने त्यांचे भाषण ऐकत असत.अन्यायाविरूद्ध बुलंद आवाज अशीच त्यांची ख्याती होती.विधानमंडळात आणि बाहेरही त्यांच्या नावाचा एक आदरयुक्त दबदबा होता.ते बोलायला लागले की, आक्रमक शैलीत बोलत.या त्यांच्या आक्रमक शैलीमुळे व अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे डिसेंबर १९९६ साली सुरू केलेला पहिला मानाचा असा “विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार” देण्यात आला.
अशा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी,ओबीसी समाजासाठी झटणाऱ्या या झुंजार लढवय्या नेत्याला त्यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त लाख लाख सलाम.


