विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
स्कूल बस चालकांकरीता कार्यशाळा संपन्न
सावंगी : ‘वाहन चालकांनी आपले वाहन सुरक्षितपणे चालवल्यास होणारा अपघात टाळता येतो. याकरिता स्वतःला नियमात बांधणे गरजेचे आहे. वाहतूक नियमानुसार लागू असलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे, याचे भान सातत्याने ठेवले पाहिजे व स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी स्थानिक अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्कूल बस व ऑटो चालकांकरिता आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्फोंसा विद्यालयाच्या व्यवस्थापिका सिस्टर फोन्सी तर मंचावर प्राचार्य सिस्टर निव्या उपस्थित होत्या.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोपाल शिंदे यांनी अपघात कसा टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केले तर पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज खान यांनी अपघात टाळण्याकरिता बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, स्पीड नियंत्रण, आपत्कालीन खिडकी, महिला परिचारिका व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.


