बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
मलकापूर:- तालुक्यातील झोडगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धोंगडर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञात व्यक्तींनी साहित्याची तोडफोड केल्याची घटना ७ जून रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, सरपंच व मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील झोडगा ग्रामपंचायतीत येणाऱ्या घोंगडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गत काळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामे व साहित्य खरेदी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती प्रयत्नशील आहे. सध्याच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळा बंद आहे.

मात्र, शाळेची पाहणी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल मेहणकर गेले होते. त्यावेळी वर्ग खोलीच्या खिडक्या, इलेक्ट्रिक बोर्ड, लाईट व लाईट फिटिंगच्या साहित्याची तोडफोड करून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मुख्याध्यापकांनी सरपंचाकडे धाव घेतली. या प्रकरणी सरपंच सुवर्णा संदीप भोळे व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची, मुख्याध्यापक अनिल मेहणकर यांच्याशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील साहित्याची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे

