संपादकीय:-
बोध कथा
विरघळलेली कुल्फी

एका कुल्फीच्या मोठ्या कंपनीत मुख्य मार्केटिंग मॅनेजर पदासाठी दोन उमेदवार अंतिम मुलाखतीपर्यंत पोहचले होते . त्यातील एकाला निवडायचं होतं . त्यांच्या H.R. मॅनेजरने त्यांची मुलाखत घेतली दोघांनी खूप चांगली उत्तर दिली . पेच कायम होता कुणाला निवडायचं ? तेव्हा त्या कंपनीच्या मालकाने त्या दोघांना त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतल व त्यांना म्हणाला आमच्या कंपनीच्या कुल्फी विषयी तुमचं मत मांडा मी तुम्हाला एक पेपर व पेन देत आहे . मी थोड्या वेळात येतो . असं म्हणून त्याने दोघां समोर डिशमध्ये एक एक कुल्फी ठेवली व तो निघून गेला . तो गेल्यावर लगेच एकाने पेपरवर त्या कुल्फीच वर्णन , तिच्या पॅकिंग विषयी सर्वकाही लिहायला सुरुवात केली . तो भराभर सर्व लिहीत होता . दुसरा उमेदवार मात्र शांत होता . त्याने ती कुल्फी उचलली व ती नीट मनसोक्त खाल्ली तिचा संपूर्ण आनंद घेतला व नंतर तिची काडी त्या डिशमध्ये ठेवली व नंतर मोजून काही गोष्टी लिहिल्या . त्यामध्ये त्याने आवर्जून कुल्फीच्या चवीविषयी लिहीलं . ही कुल्फी खाऊन मन प्रसन्न होतं असं लिहीलं . थोड्या वेळात कंपनीचा मालक आला त्याने दोघांच्या डीश पाहिल्या . पहिल्या उमेदवाराच्या डिशमध्ये एक विरघळून गेलेली कुल्फी होती तर दुसऱ्याच्या डीशमध्ये फक्त कुल्फीची काडी होती . त्या मालकाने दोघांचे पेपर वाचले व तो पहिल्या उमेदवाराला म्हणाला . तुम्ही कुल्फीच्या बाहेरील गोष्टींबद्दल खूप छान लिहीलं आहेत . परंतु तिची चव व ती खाल्ल्याने मिळणारा आनंद ह्याविषयी काहीच लिहील नाहीत . नंतर त्याने दुसऱ्या उमेदवाराला विचारलं तुम्ही खरंच खूप छान लिहीलं आहे व त्याच बरोबर तुम्ही कुल्फी खाण्याचा आनंद पण एकदम बरोबर मांडला आहे . असं म्हणून त्याने त्या दुसऱ्या उमेदवारांच अभिनंदन करून त्याची मुख्य मार्केटिंग मॅनेजर पदावर नियुक्ती केली . नंतर पहिल्या उमेदवाराकडे पाहून तो म्हणाला . ही केवळ कुल्फी नव्हती ही तुम्हा दोघांसाठी एक सुवर्णसंधी होती . तुम्ही ती वेळ घालवून गमावून बसलात .

बोध
*मित्रांनो आपल्या जीवनात पण असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्वरीत निर्णय घेणे खूप महत्त्वाच असतं . म्हणून त्वरीत निर्णय घ्या अन्यथा संधी रूपी कुल्फी कधी विरघळून जाईल समजणार पण नाही . प्रत्येक संधी ही चविष्ट कुल्फी प्रमाणे असते तिचा आनंद ती चाखली तरच मिळतो

