पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : शेतक-यांच्या गोठ्यातील जनावारे चोरी करणा-या आरोपीना रांजणगाव पोलिसांनी केली. ५ जनावरांसह वाहन, असा सात लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.रांजणगाव हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी जनावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. (दि.२२) डिसेंबर रोजी रांजणगाव हद्दीतील लांडेवस्ती, सोनेसांगवी रोडलगत राहणारे शेतकरी रमेश तबन खेडकर यांचे गोठ्यामधील पंढरपुरी जातीच्या दोन म्हैस चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
सीसीटिव्हि कॅमे-यामधील व्हिडीओ फुटेज चेक करुन आरोपी हे गुन्हयातील म्हैशी या त्यांच्याकडील पिकअप गाडीमधून कळंबाड (जि. ठाणे) येथे गेल्याचे निष्पन्न झाले. परिसरामध्ये तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ व तपासी अंमलदार हवालदार विजय सरजिने यांनी शोध घेतला. त्यांना एका गोठ्यामध्ये चोरीस गेलेल्या म्हैस दिसून आल्या. फिर्यादींनी म्हैशी ओळखल्या. त्यानंतर तपास पथकासह याठिकाणी अचानक छापा टाकला.
आरोपी पद्ममाकर उर्फ नागेश शांताराम मोरे (रा. कळंबाड) यास ताब्यात घेण्यात आले. दुसरा आरोपी पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेला आहे. पळून गेलेल्या आरोपीचे नाव नरेश भाऊ मोरे असल्याने निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेल्या 2 व इतर ठिकाणावरुन चोरलेल्या 3 अशा एकूण 5 म्हैस व गुन्हयातील पिकअप गाडी जप्त केली आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी पद्मामाकर शांताराम मोरे यास अटक केलेली आहे. त्यास (दि.९) जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस हवालदार विजय सरजिने, हवालदार विलास आंबेकर यांनी केली आहे. पुढील तपास विजय सरजिने हे करीत आहेत.
फरार आरोपी नरेश मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द घरफोडी, चोरी, जनावरे चोरी आदी ठाणे जिल्ह्यातील टोकावडे व मुरबाड पोलीस ठाण्यात एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीकडून रांजणगाव, शिरुर व पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 4 जनावर चोरीचे गुन्हे उघडकिस आले आहते. आरोपींनी पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर भागात अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्याबाबत कसून तपास सुरु आहे.


