बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा.
लोणार –ग्रामीण रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे व त्या ठिकाणी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णास नाहक आपला जीव गमवावा लागला या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेस दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे फोनवरून माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केली आहे.लोणार येथील ग्रामीण रुग्णालयाला काल सकाळी आग लागली होती या आगीमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा जळून मृत्यू झाला, रुग्णाचा मृत्यू कसा झाला याबाबतची माहिती घेण्यासाठी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी आज दिनांक 24 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली त्या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर रायमुलकर यांचा राग अनावर झाला .
जवळपास वीस बेड बसतील अशा हॉलमध्ये फक्त एकच रुग्ण उपचारासाठी दाखल होता वास्तविक पाहता रात्रीला ज्या वैद्यकीय अधिकारी , कक्षसेवक, आदी परिचारिका सुरक्षा रक्षक यांची ड्युटी होती, त्यापैकी किती कर्मचारी हजर होते याबाबत सुद्धा त्यांनी शंका व्यक्त केली तसेच रात्रीच्या वेळेस त्या हॉलमध्ये संबंधित कर्मचारी असणे आवश्यक होते, आग लागल्यानंतर तो रुग्ण संपूर्ण जळून कोळसा होईपर्यंत कर्मचारी झोपा काढत होते का असा सवाल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला कामावर हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम व्यवस्थित केले असते तर नाहक एका रुग्णास जीव गमवावा लागला नसता ज्यांची ड्युटी होती ते खरंच कामावर हजर होते का, ज्या हॉलमध्ये रुग्ण ठेवण्यात आला होता त्या हॉलमध्ये कर्मचारी होता का, फायर ऑडिट झाले होते का या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार रायमुलकर यांनी फोनवरून राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केली आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी म्हणालेकी ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून शासन करोडो रुपयांचा निधी रुग्णालयात देत आहे तसेच अनेक सामाजिक काम करणाऱ्या संघटना व्यक्तींनी व्हेंटिलेटर बेड गाद्या सह अनेक प्रकारचे साहित्य रुग्णालयात दिली आहे परंतु लोणार ग्रामीण रुग्णालयाचा कारभार संपूर्णता भोंगळ झाला असून या ठिकाणी कामावर असलेले कर्मचारी सातत्याने विना परवाना गैरहजर राहतात, मनाला वाटेल त्यावेळेस कामावर येतात यांना कोणाची बंधन नसून यांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला रुग्णाच्या मृत्यूस संबंधित कर्मचारी जबाबदार असून यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्राध्यापक मापारी यांनी केली आहे. यावेळी शिवसेनेचे पांडुरंग सरकटे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गजानन मापारी, नगरसेवक डॉक्टर अनिल मापारी, माजी शहर प्रमुख अशोक वारे, मेहकर शिवसेना उपतालुकाप्रमुख समाधान साबळे युवा सेनेचे शैलेश सरकटे, गुलाब सरदार, शिवसेना शहर उपाध्यक्ष देवा चौधरी सह शिवसैनिक प्रामुख्याने हजर होते


