कर्जत तालुक्यातील युवक पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी कर्जत पोलिस ठाण्यात निवेदन दिले.प्राप्त माहितीनुसार, ही घटना दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कुडेकर व त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे ठाकरे उपहारगृह येथे चहा घेतल्यानंतर परतत असताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने त्यांना थांबवले.
पत्ता विचारत असावा असे वाटल्याने दोघे थांबले. त्या क्षणी चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी फायटर, लोखंडी पाईप व धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला चढवला.या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून, रणदिवे यांनी प्रसंगावधान राखत कुडेकर यांचे प्राण वाचवले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर सिल्व्हर रंगाच्या वॅगनर गाडीतून पळून गेले.
या घटनेविरोधात ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ने कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष अभिजीत दरेकर, कार्याध्यक्ष संकेत घेवारे, कर्जत तालुका अध्यक्ष बाळू गुरव, तसेच राकेश खराडे, सुभाष सोनवणे, किशोर साळुंके, सचिन यादव, मंगेश म्हसकर,आणि सुधीर देशमुख व्हाॅईस आॅफ मीडिया खालापुर तालुका उपाध्यक्ष व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ११८(१), ११५(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

