अकोला जिल्हा प्रतिनीधी: – इम्रान खान सराफराज खान
अकोला येथील धोकादायक कडुलिंबाचे झाड काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. 14 एप्रिल रोजी रात्री अकोला-बार्शीटाकळी मार्गावरील शिवापूर क्रॉसिंगजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. बुलेट मोटारसायकलवरून निघालेल्या तरुणाचे वाहनावरील ताबा सुटून ती कडुलिंबाच्या झाडावर आदळल्याने रात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात उफैज खान अहमद खान (रा. बार्शीटाकळी) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार सुफियान खान हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या कडुलिंबाच्या झाडामुळे आधीच अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले असून, आजपर्यंत या झाडाने अनेकांचे प्राण घेतले आहेत. हे धोकादायक झाड लवकरात लवकर हटवावे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई केली तर आणखी जीव वाचू शकतात.
