(अकोला जिल्हा प्रतिनीधी:- इम्रान खान सरफराज खान)
अकोला:मूर्तिजापूर तालुक्यात मागील एका महिन्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याने नागरिकांना स्वतः रात्र जागून पहारा द्यावा लागत आहे. पोलिसांचे जे काम आहे, ते त्यांच्याकडून व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना स्वतः पेट्रोलिंग करावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र मुर्तिजापूरात बघायला मिळत आहे.
चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पोलिस प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. वाढत्या चोरीच्याघटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून, ग्रामीण व शहरी भागातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत, घरफोडी, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी अशा घटनांमुळे नागरिक आता रात्रभर जागून स्वतः घराची रखवाली करीत आहेत.
या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घरी एकट राहणं धोक्याच वाटू लागलं आहे. काही महिला रात्री घराबाहेर जाण टाळत आहेत. वृद्ध व लहान मुलांमधेदेखील मानसिक अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

