प्रा अविनाश भारती यांचे प्रतिपादन
गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
ग्रामीण भागात शिक्षणाची मोठी दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे परंतु शिक्षणाच्या संधी आणि सोयी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. फुलसावंगी सारख्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक वातावरणात तग धरावी यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून फुलसावंगी पत्रकार संघ मागील दोन वर्षापासून सातत्याने पत्रकार दिनी शैक्षणिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. सामाजिक जाणीवने काम करण्याची येथील पत्रकार बांधवांची तळमळ अत्यंत प्रेरणादायी आहे. वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सामाजिक चळवळीत सहभाग असणे काळाची गरज आहे असे ओजस्वी प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते आणि मार्गदर्शक प्रा. .अविनाश भारती यांनी केले. फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, संपादक गजानन वाघमारे, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे,डॉ.पुंडलिक आमले, कुणाल नाईक, ए.एस. गायकवाड, प्रा.विनोद राठोड, प्रा. सुधीर भाटे, प्रा. संदीप चंद्रवंशी,पत्रकार शिवानंद राठोड, संदीप कदम, यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.अविनाश भारती म्हणाले की, ग्रामीण भागातील असल्यामुळे वर्तमान शैक्षणिक स्पर्धेत टिकणार नाही हा न्युनगंड विद्यार्थ्यांनी आधी झिडकारला पाहिजे. देशाच्या क्रांतीचे जनक गावखेड्यातच जन्मले हे लक्षात ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, तुम्ही गरीबीत जन्मले ही तुमची चूक नाही मात्र तुम्ही गरीबीत मेले तर तो मात्र तुमचा गुन्हा आहे. ‘मी हे करू शकतो’ ही सकारात्मक वृत्तीच प्रगतीकडे जाण्यास सहाय्यभूत ठरते. शिकताना आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आम्ही शिक्षकांच्या छड्या खाल्ल्या. ज्यांनी शिक्षकांचा मार खाल्ला ते विद्यार्थी भाग्यशाली व नाही खाल्ला ते कमनशिबी आहेत. या काळात शिक्षकाने विद्यार्थ्यास छडी मारली तर पालक वर्गात जाऊन शिक्षकास दम देतात, प्रसंगी गुन्हा दाखल करतात. शिक्षणातून छडी हद्दपार झाली तेव्हापासून आयुष्यातून शिक्षण हा प्रकार बाद झाल्याची खंत प्रा.अविनाश भारती यांनी व्यक्त केली. शाळेत विद्यार्थ्यांची हिरोगिरी वाढली. मोटरसायकलचे सायलेन्सर बदलून जोरात आवाज काढत गावातून फिरण्याचे फॅड आले. तुझ्या गाडीच्या सायलेन्सर चा आवाज ऐकून लोक पाठीमागे किती घाण शिव्या देतात ते एकदा बघून घे असा सल्ला त्यांनी दिला. वर्तमान पिढी मोबाईलच्या नादाला लागली. मोबाईलचे चांगले परिणामही आहेत मात्र त्याचा विध्वंसक उपयोग आयुष्याला मारक ठरत आहे. इतरांच्या रिल्स पाहण्याऐवजी आपल्या रील्स लोकांच्या मोबाईल स्टेटसला याव्या, एवढी मोठी कामगिरी करण्याची धमक ठेवा असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला. विद्यार्थ्यांनी स्वतःची गुणवत्ता ओळखावी आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे. ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला तो प्रत्येक क्षेत्रात हमखास यशस्वी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मोबाईल वेडी पिढी स्वप्नात जगते. रिल्स पाहून प्रियसी प्रियकरायला म्हणते की तुझ्या घराचा मी स्वर्ग करेन. प्रत्यक्षात तिला वरण-भातही करता येत नाही. त्यालाही आकाशातील चंद्र तारे तिच्या डोळ्यात दिसतात. पोरीच्या डोळ्यात चंद्र तारे पाहण्यापेक्षा अहोरात्र कष्ट करणारी माय आणि मातीत राबणारा बाप ज्या दिवशी प्रेयसीच्या डोळ्यात दिसेल तो खरा परिवर्तनाचा दिवस असेल असे मौलिक प्रतिपादन अविनाश भारती यांनी केले. प्रबोधन करणारे शिक्षक असो की माझे भाषण, हे तात्पुरता परिणाम करतील, मात्र मनातून आग लागली तर तुमचा जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. कोंबडीचे अंडे बाहेरून फुटले तर फार तर भाजी होईल, मात्र ते आतून फुटले तर नव्या जीवनाचे सृजन करते. आपणही आतून फुटायला शिकले पाहिजे असा सल्ला प्रा.अविनाश भारती यांनी विद्यार्थ्यांना दिला. लहान वयात विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत. व्यसन ही फॅशन झाली. व्यसन करून भरधाव बाईक चालविणाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या घरी भेट द्या. आई-वडिलांचा उघडा पडलेला संसार पाहून तुमचा उर फाटेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून चार हात लांब राहिले पाहिजे. लाखो रुपये खर्चून आज महागडे शिक्षण घ्यावे लागते. आमच्या काळात महामंडळाच्या युरिया ची रिकामी पिशवी म्हणजे दप्तर होते, आणि आई निरमा टाकून ती थैली धुवायची. कॅमलच्या कंपास हाच आमच्या पिढीला ॲप्पल मोबाईलचा आनंद द्यायचा. जुन्या काळात शालेय संसाधने नव्हती मात्र शिकायची प्रचंड इच्छा होती, त्यामुळेच आपण या स्टेजपर्यंत पोहोचलो असे प्रा.अविनाश भारती यांनी अभिमानाने सांगितले. निर्धार करून कामाला लागले तर काही अशक्य नाही. काय करायचे हे ठरवून प्रयत्नपूर्वक काम केले तर एकट्या फुलसावंगीतून दहा कलेक्टर तयार होतील असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या बापाने गरिबीत दिवस काढलेत. काळ प्रतिकूल होता. आपला बाप कोण आहे आपण ठरवू शकत नाही, मात्र आपला बाप कोणाचा बाप आहे ते ठरविण्याची धमक आपल्यात आहे. पडद्यावरच्या हिरोला बाप मानण्यापेक्षा आपल्या बापाला हिरो माना आणि त्याच्या कष्टाची किंमत करून आयुष्यात पुढे जा असा मोलाचा सल्ला प्रा. अविनाश भारती यांनी विद्यार्थ्यांना दिला. दोन तासांच्या प्रबोधनपर व्याख्यानात त्यांनी कित्येकदा टाळ्या घेतल्या व सर्वांची मने जिंकली.
शेख आबिद च्या गझलेचा गौरव
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.अविनाश भारती यांनी महागाव तालुक्यातील सवना येथील प्रतिभावंत गझलकार शेख आबिद यांच्या गझलांमधील काही शेर ऐकविले.
माणूस का तरीही माणूस होत नाही
पाषाण देव झाले शेंदूर फासल्याने
हा शेर सांगून ते म्हणाले की, शेंदूर फासल्याने दगडाचा देव होतो. माणसे मात्र माणूस व्हायला तयार नाहीत. त्यांचे वागणे पाशवी होत चालले आहे.
हे सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही
विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने
शाळेत सत्यमेव जयते चा जयघोष करणारी पुस्तके आहेत परंतु प्रत्यक्षात सत्याचा विजय होताना दिसत नाही. हा विश्वासघात घेऊन आमच्या पिढ्या जगत असल्याची खंत प्रा. भारती यांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी प्रा.अनंत राऊत यांची ‘मित्र वणव्यामधे गारव्यासारखा’ ही गझल सादर करून आपल्या व्याख्यानाची सांगता केली.
कार्यकमाचे सुरेख सूत्रसंचालन पत्रकार तसलीम शेख यांनी केले. फुलसावंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक पांढरे, उपाध्यक्ष डॉ. गजानन वैद्य, शैलेश वानखेडे, विवेक शेळके, संजय जाधव, चंद्रशेखर पंडागळे, शेख रिजवान, विक्की भिसे, शैलेश पेंटेवाड, ज्ञानेश्वर सोमेवाड यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
मधुकर पांढरे यांचा सत्कार
ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र वितरक मधुकर पांढरे यांचा फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने हृद्द सत्कार करण्यात आला. मागील अर्धशतकापासून मधुकर पांढरे फुलसावंगी येथे वृत्तपत्र वितरक आणि पत्रकार म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत. अत्यंत निष्ठेने त्यांनी पत्रकारिता केली आणि वृत्तपत्र वितरणाचे कामही केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.