वर्धा विभाग:- युसूफ पठाण
वर्धा :- भारतीय संविधानाच्या 75 वर्षाच्या गौरवशाली वाटचालीची दखल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण भारतभर संविधान गौरव अभियान राबविले जात असून या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून आज दिनांक 21 जानेवारी ला वर्धा जिल्हा भाजपा कार्यालयात या अभियानाच्या संयोजन समितीची बैठक पार पडली.
बैठकीला जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, अभियानाचे जिल्हा संयोजक अशोक विजयकर, जिल्हा महामंत्री जयंत कावळे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वरून पाठक, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव सर्वश्री प्रमोद राऊत, वरून पांडे उपस्थित होते. जिल्हा संयोजक अशोक विजयकर यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
बैठकीला उपस्थित जिल्ह्यातील विविध मंडळाचे संयोजक व सहसंयोजकांना उद्देशून जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले की हमारा संविधान- हमारा स्वाभिमान आणि संविधानाप्रती भाजपाची असलेली प्रतिबद्धता यास्तव देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी व राज्यातील महायुती सरकार यांनी अनुसूचित जाती जमाती घटकाकरिता तसेच गरीब शोषित व वंचितांच्या कल्याणासाठी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्मिता जपण्यासाठी आपल्या सत्ता काळात केलेल्या ठोस कामांची माहिती जनमानसापर्यंत नेण्याचे आवाहन केले. तसेच शाळा, महाविद्यालय, वसतिगृहात जाऊन भारतीय संविधानाच्या 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाची महती पटवून देण्याकरिता निबंध, भाषण स्पर्धा, व्याख्यान व चर्चासत्रांचे ठिकठिकाणी आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच दिनांक 25 जानेवारीला भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांनी त्यांच्या बूथमधे व थोर महापुरुषांचे पुतळे असलेल्या ठिकाणी लोकांना सहभागी करून भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना व मार्गदर्शक तत्त्वांचे सामूहिक रित्या वाचन करावे असे या बैठकीत आवाहन करण्यात आले.