वर्धा जिल्हा प्रतिनीधी: – युसूफ पठाण
आज दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी नांदोरा या गावात सहजीवन प्रकल्पाच्या अंतर्गत एक आगळीवेगळी जनजागृती रॅली पार पडली. या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आजी-आजोबा आणि नातवंडांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. त्यांच्या उत्साहाने आणि समर्पणाने गावात एक वेगळाच ऊर्जेचा संचार झाला.
ही रॅली २४ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतरपिढी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती.
भारताकडून या सप्ताहाच प्रतिनिधित्व सामुदायिक वैदकीय विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम करत आहे.
या विशेष सप्ताहामध्ये समाजामध्ये पिढींच्या एकत्रित सहभागातून समाजात बदल घडवणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. याचाच एक भाग म्हणून नांदोरा गावात सहजीवन प्रकल्पाअंतर्गत ही रॅली होती.
रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद शाळेपासून झाली. हातात फलक आणि घोषणा देत आजी-आजोबांची टोळी आणि त्यांच्या पाठीमागे नातवंडांचा जल्लोष, असा नयनरम्य आणि मनाला भावणारा देखावा पाहायला मिळाला. “पिढ्या जोडूया, संस्कार घडवूया”, “आजी-आजोबांचे अनुभव, नातवंडांसाठी मार्गदर्शक”, अशा घोषणा देत संपूर्ण गावात रॅली फिरली.

या उपक्रमाचा उद्देश वृद्ध आणि लहान पिढीतील सुसंवाद वाढवणे, परंपरेचा वारसा पुढे नेणे आणि सामाजिक एकोप्याला चालना देणे हा होता. सहजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून पिढ्यांमधील अंतर कमी करणे आणि परस्पर सहकार्य वाढवणे या हेतूने ही रॅली घेतली गेली.
या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, तसेच महिला मंडळांनी देखील सहभाग नोंदवला.
