✒️ पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख महाराष्ट्र ✒️
संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा, 353 सी आलापल्ली-सिरोंचा रस्त्याचे बांधकाम
अहेरी : आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील रस्त्यावरील आणि पुलांच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक हैराण झाले असून, २६ एप्रिल २०२५ पर्यंत डांबरीकरण पूर्ण न झाल्यास २८ एप्रिलपासून चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात अपूर्ण पुलांमुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन केला होता, आणि यंदाही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर महामार्गावरील अनेक लहान-मोठ्या पुलांचे काम मागील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी सुरू झाले. मात्र आजतागायत हे काम पूर्ण न होता, अर्धवट स्थितीतच आहे. रस्त्यावर टाकलेली गिट्टी, उघडे खड्डे व अपूर्ण डांबरीकरणामुळे वाहनांची पंचर होणे, अपघात होणे, हे प्रकार सर्रास घडत आहेत.नागरिक, शेतकरी बाजारात माल पोहोचवताना हेच रस्ते वापरतो. गाड्यांचे पंचर, अपघात, प्रवासात खोळंबा या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो. जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. असे मत नंदिगावचे रहिवासी संदीप दुर्गे यांनी व्यक्त केले. अल्लापली ते गुड्डीगुडम दरम्यान सुरू असलेल्य रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम २६ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण झाले नाही, तर २८ एप्रिलपासून तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. संबंधित प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहे. सदर कामाचे ठेकेदार हे काम अत्यंत संथ गतीने आणि दर्जाहीन पद्धतीने करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुलांचे सांचे महिनोनमहिने तसेच उभे असून, कोणतीही गती कामात दिसून येत नाही. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे दुचाकीस्वार विशेषतः वृद्ध व महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून, काही ठिकाणी किरकोळ जखमी होण्याचे प्रकारही घडले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर म्हणाले, “सदर रस्त्याचे काम केवळ संथच नाही, तर निकृष्ट दर्जाचे आहे. पुलांचे साचे महिनोनमहिने तसेच पडून आहेत. अपघातात जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण? विकासाच्या नावाखाली नागरिकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे.”
