राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अध्याप लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी राळेगाव येथील तहसीलदारांना केली आहे.
राळेगाव तालुक्यामध्ये शासनातर्फे आर्थिक दुर्बल कुटुंब, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी घरकुल योजना मंजूर झाली असून लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे १५००० हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे, तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे.
घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, राळेगाव तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळत नसून याच संधीचा फायदा घेवून रेती तस्कर ज्यादा दराने मोठी रक्कम आकारून रेती देत आहेत, वाढत्या महागाई मुळे घर बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत किंवा गाडी भाडे व मजुरी आकारून रेती उपलब्ध करून द्यावी तसेच ही रेती देताना घरकुल यादीतील क्रमवारीने तसेच ऑफलाईन पद्धतीने द्यावी कारण अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण ही रेती देताना ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा जेणेकरून या लाभार्थ्यांना ते सोयीचे होईल. त्यामुळे महसूल प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालूका अध्यक्ष सुरज लेनगुरे, स्वप्नील नेहारे, सचीन आत्राम, संदिप गुरूनुले, तुषार वाघमारे, साहिल गजबे, रोहन वाघ, रोशन गुरूनुले, घरकूल लाभार्थ्यी आणी महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते.
