वर्धा जिल्हा प्रतिनीधी: – युसूफ पठाण
सोनेगाव, दि. 25/04/2025 – महात्मा गांधी आयुर्वेद ज्ञान संस्था अंतर्गत सुरू असलेल्या इलाईट प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक आंतरपिढी सप्ताह (Global Intergenerational Week) साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा दुसरा दिवस सोनेगाव स्टेशन येथे पारंपरिक आणि आधुनिक कला प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण भजन वंदनेने करण्यात आली. यानंतर नृत्य, गायन, कविता सादरीकरण तसेच लहान मुलांचे सांघिक गीत सादरीकरण यांसारख्या विविध कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे भरभरून कौतुक करण्यात आले, ज्यामुळे सहभागी कलाकारांचे मनोबल वाढले.
कार्यक्रमाच्या आयोजनात गावातील आशा कार्यकर्त्या, आजी-आजोबा आणि नातवंडांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. कार्यक्रमाने विविध पिढ्यांमध्ये संवाद, स्नेह आणि सांस्कृतिक नाते दृढ करण्याचा सकारात्मक संदेश दिला.
