वर्धा जिल्हा प्रतिनीधी: – युसूफ पठाण
उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट मार्फत मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांच्याकडे प्रमुख मांगन्या निवेदनातुन देण्यात आली
हिंगणघाट – दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरण व्हॅली येथे झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा हिंगणघाट मुस्लिम समाजाकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. समाजाचे प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन पाठवून ही घटना अमानवी आणि भ्याड असल्याचे स्पष्ट केले.
हिंगणघाट मुस्लिम समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की, देशाच्या ऐक्य, शांतता आणि सौहार्दाच्या विरोधात घडवून आणलेली ही क्रूर घटना संपूर्ण मानवतेला लज्जास्पद आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून लोकांची हत्या केल्याचे समोर आले असून, अशा प्रकारच्या हिंसेला इस्लाम धर्म कधीच मान्यता देत नाही. इस्लाम आणि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीनुसार मानवतेचे रक्षण करणे, दया, करुणा आणि शांततेचा प्रचार करणे हाच खरा धर्म आहे.
कुरआनमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, “ज्याने एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला, त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव घेतला, आणि ज्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला, त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव वाचवला.” त्यामुळे अशा हिंसक कृत्यांना इस्लामशी जोडणे हे पूर्णतः चुकीचे आहे.
हिंगणघाट मुस्लिम समाजाने सरकारकडे मागणी केली आहे की, या हल्ल्याची उच्चस्तरीय व पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाहीत. अतिरेकी संघटनांच्या मुळावर घाव घालून देशातील नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली जावी, अशी देखील मागणी करण्यात आली.
या अमानवी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना समाजाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या परिवारांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे. जखमींच्या त्वरित बरे होण्याची प्रार्थना करण्यात आली आहे. हिंसा कोणत्याही धर्माचा भाग नाही. हिंगणघाट मुस्लिम समाज नेहमी शांतता, ऐक्य आणि मानवतेच्या बाजूने उभा राहणार आहे.
–
