माहिती संकलन विभाग प्रमुख: – पियुष गोंगले
आंजी मोठी:-
मुलं, किशोरवयीन तरुणाई आणि जेष्ठ नागरिक यांच्यातील संवाद वाढवण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येणारा जागतिक आंतरपिढी सप्ताह २०२५ यावर्षी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम अंतर्गत सुरू असलेल्या सहजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विविध गावांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक ,कौशल्य विषयक, शारीरिक हालचाली तसेच शिक्षणविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर आज प्राथमिक आरोग्य केंद्र आंजी अंतर्गत येणाऱ्या बोरगाव सावळी गावात जलामाता देवस्थान हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गावातील सहजीवन प्रकल्प गटातील आजी-आजोबा, नातवंडे, किशोरी व युवक-युवती यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक भजनाने झाली. त्यानंतर काही आजी आणि त्यांच्या नातवंडांनी एक नाटिका सादर केली, ज्यामध्ये सध्याच्या पिढीतील बदल याचे मनोरंजक सादरीकरण करण्यात आले. जेष्ठ नागरिकांनी पारंपरिक गीतांचे गायन केले, तर काहींनी नृत्य सादर करत उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले. किशोरी गटाने सांस्कृतिक नृत्य आणि संवादात्मक स्किटच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमामुळे गावातील विविध वयोगटांतील लोक एकत्र आले, संवाद झाला, आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. तर लहान मुलांनी आणि किशोरवयीन मुलांनी त्यांच्यातील ऊर्जा, कल्पकता यांची झलक सादर केली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गावातील सहजीवन गट, आशा स्वयंसेविका सौ. रंजना ढाले, सहजीवन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. राहुल पेठे, फील्ड कोऑर्डिनेटर पल्लवी कातरकर, जितेंद्र सहारे आणि दिनेश धारपुरे यांनी विशेष मेहनत घेतली.
